राजकीय नेत्यांना पाठिंबा देणारे आतापर्यंत वेगवेगळे कार्यकर्ते तुम्ही पाहिले असतील. साहेबांचा आदेश म्हटलं की मागचा-पुढचा विचार न करता काम चोख बजावणारे, गल्लोगल्ली घोषणा देत फिरणारे किंवा साहेबांच्या वाढदिवशी जंगी कार्यक्रम करणारे. पण अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अनोख्या कार्यकर्त्याची दखल संपूर्ण देशभर घेतली जात आहे. योगींचा समर्थक म्हणून ओळखला जाणारा प्रभाकर मौर्य यानं अयोध्येत चक्क योगी आदित्यनाथ यांचं मंदिर उभारलं आहे. प्रभाकर हे सकाळ-संध्याकाळ मंदिरात आदित्यनाथ यांच्या मूर्तीची आरतीही करतात. एवढंच नाही तर प्रभाकर मौर्य यांनी मुख्यमंत्री योगींच्या समर्थनार्थ शेकडो गाणी देखील गायली आहेत.
यूट्यूबवर प्रभाकर मौर्य यांची लाखो फॉलोअर्स आहेत आणि योगींच्या मंदिराच्या बांधकामात जो काही खर्च झाला आहे, तो यूट्यूबवरून कमावलेल्या पैशातून केल्याचे प्रभाकर मौर्य सांगतात. प्रभाकर मौर्य यानं ५ ऑगस्ट २०२० रोजी योगींच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला होता. त्याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाच्या राम मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजनाचं काम केलं होतं.
अयोध्या धामपासून सुमारे 20 ते 25 किमी अंतरावर परिवहन विभागाच्या प्रादेशिक कार्यशाळेच्या मागे असलेल्या पूर्वा गावात योगी आदित्यनाथांचं मंदिर बांधण्यात आलं आहे. प्रभाकर सकाळ संध्याकाळ मंदिरात आरतीही करतात. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या खास मंदिराच्या उभारणीची चर्चा गावागावात रंगत आहे.
योगींच्या उंचीएवढीच साकारली मूर्तीयोगींच्या मंदिरात योगींची धनुर्धारी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या पुतळ्याचा आकार ५ फूट ४ इंच आहे. ही उंची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उंचीइतकीच आहे. प्रभाकर मौर्य हे योगींचे कट्टर समर्थक आहेत, योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा त्यांचा सन्मान देखील केला आहे. प्रभाकर मौर्य यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून जी कमाई केली त्यातूनच मंदिराची उभारणी केली असल्याचं ते सांगतात. मौर्य यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर शेकडो गाणी रचली आहेत.