नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्त यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांनी सोमवारी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा ही माहिती देण्यात आली तेव्हा ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या टीम-11 सोबत महत्वाची बैठक करत होते. मात्र, निरोप मिळाल्यानंतरही ते विचलीत झाले नाही आणि त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. मात्र यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.
किडनी आणि लिव्हरचा होता त्रास -आनंद सिंह बिष्त यांना किडनी आणि लिव्हरचा त्रस होता. प्रकृती खालावल्याने त्यांना 13 मार्चरोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टर विनीत आहूजा यांचा चमू त्यांच्यावर उपचार करत होता.
फॉरेस्ट रेंजर पदावरून झाले होते निवृत्त -आनंद सिंह हे उत्तराखंडमधील यमकेश्वरच्या पंचूर गावात राहत होते. ते येथेच फॉरेस्ट रेंजर पदावरून 1991 साली निवृत्त झाले होते. तेव्हापासूनच ते आपल्या गावी राहत होते.
योगी घर सोडून गोरखपूरला निघून गेले होते -योगी आदित्यनाथ हे लहानपणीच आपले घर सोडून गोरखपूरला महंत अवेद्यनाथ यांच्याकडे गेले होते. यानंतर योगी आदित्यनाथ हे अवेद्यनाथ यांच्या जागी महंत झाले. निवडणुकीनिमित्त गावी गेल्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटत असतात.