लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीचे 'संरक्षक' मुलायम सिंह यादव यांची बुधवारी भेट घेतली. दिवाळी सणानिमित्त मुलायम सिंह यादव यांना शुभेच्छा देण्यासाठी योगी आदित्यनाथ त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री आणि मुलायम सिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव सुद्धा उपस्थित होते. या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी मुलायम सिंह यादव यांच्या तब्येतीची विचारपूसही केली.
याआधीही योगी आदित्यनाथ यांनी मुलायम सिंह यादव यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यावेळी मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव सुद्धा उपस्थित होते. मात्र, आज झालेल्या भेटीदरम्यान अखिलेश यादव उपस्थित नव्हते.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात भाजपा आणि समाजवादी पार्टी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येतात. मात्र, योगी आदित्यनाथ आणि मुलायम सिंह यादव यांची आज झालेली औपचारिक भेट सुद्धा एक चर्चेचा विषय झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अशी चर्चा होती की, शिवपाल यादव यांच्या नवीन पार्टीसोबत भाजपा युती करेल. पण, असे झाले नाही. शिवपाल यादव यांच्या पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवली होती.
कल्याण सिंह यांचीही घेतली भेटमुलायम सिंह यादव यांच्याशिवाय योगी आदित्यनाथ यांनी भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचीही भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच, त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी सुद्धा केली होती.