लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि शिवपाल यादव उपस्थित होते. मुलायम सिंह यादव यांची तब्येत खालवल्याने त्यांना रविवारी सायंकाळी राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, मुलायम सिंह यादव यांना हायपर ग्लायसिमिया (हायपर टेन्शन) आणि हाय डायबिटीजच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मुलायम सिंह यादव यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी मुलायम सिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव आणि मुलगा अखिलेश यादव यांनीही त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
लोकसभा निवडणुकीत मुलायम सिंह यादव यांनी मैनपुरी येथून निवडणूक लढवत विजय मिळवला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंह यादव यांना प्रकृतीच्या काही समस्या उद्भवू लागल्या आहेत. काल सकाळी त्यांना अशक्तपणा वाटू लागल्याने हृदयरोग विशेषज्ञ डॅा. भुवनचंद तिवारी यांना दाखवण्यात आले होते. यावेळी मुलायम सिंह यादव यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले, त्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.