Ayodhya Ram Mandir News: श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मूर्ती आसनावर विधिवत पद्धतीने ठेवण्यात आली. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुरू असलेल्या विधींपैकी एक असलेला गणेशपूजन, वरुणपूजा, जलाधिवास विधी पार पडला. अवघ्या काही तासांवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आला असून, अद्यापही यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. देशातील चारही पीठांच्या शंकराचार्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मुद्द्यावरून स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.
राम मंदिरात स्थापन होणाऱ्या रामलला मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धान्याधिवास विधी पार पडणार आहेत. त्यानंतर शर्कराधिवास, फलाधिवास आणि पुष्पाधिवास हे विधी होणार आहेत. मात्र, हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांना तसे सुचवणे ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे योग्य नाही. हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे, असे सांगत शंकराचार्यांनी राम मंदिर सोहळ्याला हजर राहण्यास नकार दिला. यावर योगी आदित्यनाथ यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
श्रीरामांपेक्षा कुणीही मोठा नाही
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शंकराचार्यांनी यायला हवे. आम्ही त्यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. आज जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही. मी असेन किंवा देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य असतील, मात्र, कुणीही प्रभू श्रीरामांपेक्षा मोठा नाही. प्रभू श्रीरामांमुळे आपण आहोत, आपल्यामुळे प्रभू श्रीराम नाही. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. शंकराचार्यांनी सोहळ्याला उपस्थित राहिले पाहिजे, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.
दरम्यान, केवळ ज्योतिर्पीठाच्या शंकराचार्यांनी या सोहळ्याच्या विरोधात भाष्य केले आहे. परंतु उर्वरित तीन शंकराचार्यांनी हे स्पष्ट केले आहे की, ते या सोहळ्याचे पूर्ण समर्थन करत आहेत, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हटले आहे. तर, राम मंदिराचा सोहळा ही अतिशय आनंदाची बाब आहे, असे शृंगेरी पीठ स्वामी भारती तीर्थ आणि द्वारका पीठ शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.