रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून ते पश्चिम बंगालपर्यंत देशातील अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. पण सांप्रदायिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणवल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातून मात्र, अशी एकही घटना समोर आली नाही. यासंदर्भात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही. दंगली तर दूरचा विषय, उत्तर प्रदेशात शांतता आहे. येथे गुंडगिरी आणि अराजकतेला कुठलेही स्थान नाही.
लखनौ येथे मंगळवारी सायंकाळी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "परवा रामनवमी होती. उत्तर प्रदेशात एकूण 25 कोटी लोक राहतात. येथे 800 ठिकाणी रामनवमीनिमित्त शोभायात्रा अथवा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. याच बरोबर सध्या रमजानचा महिनाही सुरू आहे. यामुळे रोजा इफ्तारचे कार्यक्रमही होतच असतील. पण, दंगलींचा विषय तर सोडच, कुठे साधे तू-तू-मी-मीही झाले नाही."
योगी पुढे म्हणाले, ''यवरून उत्तर प्रदेश आता विकासाचा विचार करत असल्याचे दिसून येते. आता गुंडगिरी, अराजकता आणि अफवांना कुठलेही स्थान नाही. हे उत्तर प्रदेशने रामनवमीला, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामांच्या जयंतीनिमित्त सिद्ध केले आहे.'' तत्पूर्वी, देशातील गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांत अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.