कैराना:उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. कैराना येथे ४२५ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या विकासकामांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी लोकार्पण केले. यावेळी जनतेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तालिबानी मानसिकता खपवून घेतली जाणार नाही. तालिबानी मानसिकता असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
तालिबानी मानसिकता काही झाले, तरी खपवून घेतली जाणार नाही. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. आमच्या अस्मितेला तडा जाऊ देणारे तसेच दंगली घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर इतकी कठोर कारवाई केली जाईल की, त्याच्या पुढील पिढ्या दंगली काय असतात, हेही विसरून जातील, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिला.
केवळ कट्टर धार्मिकतावाद्यांकडून तालिबानचे समर्थन
उत्तर प्रदेशच्या भूमीवर तालिबानी कृत्याचे जो समर्थन करेल, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. तालिबानी कृत्यांचे समर्थन करणे म्हणजे समाजाला मध्य युगाकडे नेण्यासारखे आहे. धार्मिक कट्टरतावाद्यांकडून तालिबानी कृत्याचे समर्थन केले जात आहे. मात्र, या गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये चालू देणार नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी ठणकावून सांगितले. तसेच कैराना येथून पलायनाच्या घटनांबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले की, हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. तर प्रदेश आणि देशाच्या आन, बान आणि शानचा प्रश्न आहे. आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. अयोध्येतील राम मंदिराबाबत, अनुच्छेद ३७० रद्द केल्याबाबत या लोकांना आनंद होत नाही, तर मुजफ्फरनगर येथे दंगली झाल्यावर यांना आनंद होतो. अशा तालिबानी मानसिकतेला उत्तर प्रदेशात थारा नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
दरम्यान, सन २०१५ ते २०१७ या कालावधीत सुमारे ९० हिंदू कुटुंबीयांनी कैराना भागातून पलायन केले होते. घराबाहेर विक्रीसाठी घर उपलब्ध आहे, असे फलकही लावण्यात आले होते. तत्कालीन भाजप खासदार हुकुम सिंह यांनी याबाबत आवाज उठवला होता. यापैकी बहुतांश हिंदू कुटुंबीय कैराना येथे परत आली आहेत. तर, आता उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्यामुळे पलायन केलेली कुटुंबे आता परतली आहेत, असा दावा योगी सरकारकडून केला जात आहे.