Ayodhya Ram Mandir: प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. हळूहळू राम मंदिर आकारास येत आहे. आगामी वर्षभरात राम मंदिर भाविकांसाठी खुले होईल, असा दावा केला जात आहे. यातच आता जगभरातील पवित्र नद्यांचे पाणी भारतात आणण्यात आले असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामलल्लावर महाजलाभिषेक करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशिया, युक्रेन, पाकिस्तानसह जगभरातील सुमारे १५५ देशांतील पवित्र नद्यांचे पाणी भारतात आणण्यात आले आहे. याने प्रभू श्रीरामांवर महाजलाभिषेक करण्यात येणार आहे. २३ एप्रिल रोजी योगी आदित्यनाथ विशेष कार्यक्रमात हा जलाभिषेक करणार असल्याचे सांगितले जात आहे. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी मंदिरात देशातीलच नव्हे तर जगातील नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला जाणार आहे. यासाठी एका भव्य आणि संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
२०२० पासून नद्यांचे पाणी एकत्र करण्याची मोहीम
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, विजय जौली यांच्या नेतृत्वाखाली एक टीम १५५ देशांतील नद्यांचे पाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुपूर्द करेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २३ एप्रिल रोजी मणिराम दास छावणी सभागृहात 'जल कलश' पूजन करतील. सन २०२० मध्ये गैर-सरकारी संस्थेने दिल्ली स्टडी ग्रुपने पाणी गोळा करण्यासाठी ही मोहीम सुरू केली. या संघटनेचे अध्यक्ष दिल्लीतील भाजपचे माजी आमदार विजय जौली आहेत. आता जगभरातील नद्यांचे पाणी जमा करण्यात आले असून, विजय जौली अयोध्येत परतले आहेत.
रशिया, युक्रेनसह १५५ देशांतून जमा केले पाणी
माजी आमदार विजय जॉली यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, दिवंगत अशोक सिंघल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रतिज्ञा घेतली होती की, जगभरातील नद्या आणि समुद्राचे पाणी जमा करून त्या पाण्याने राम मंदिरात प्रभू श्रीरामांवर जलाभिषेक करू. पाकिस्तानच्या राबी नदीसह जगभरातून वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी मोठ्या कष्टाने गोळा करण्यात आले आहे. युद्धाच्या काळातही रशिया आणि युक्रेनच्या नद्यांचे पाणी जमा झाले आहे. पाकिस्तानातून पाणी आणणे कठीण होते. मात्र, तेथील हिंदू बांधवांनी मेहनतीने दुबईमार्गे पाणी पाठवण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात धार्मिक, अध्यात्मिक गुरुंसह देशातीलच नव्हे तर परदेशातील मान्यवरांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे. श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी देशातील पवित्र नद्यांचे पाणी आणि पवित्र स्थळांची माती आणून पायाभरणी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा श्र राम मंदिरात पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक करण्याची तयारी सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"