लखनौ - उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आज मतदान होत आहे. त्यासाठी, पहिल्या टप्प्यात ३७ जिल्ह्यांमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनीही मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आलीय.
मुख्यमंत्री योगी यांनी गोरखपूरच्या झुलेलाल मंदिराजवळील गोरखनाथ कन्या प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्र ७९७ वर सकाळी ७ वाजून १ मिनिटांनी मतदान केलं. आपल्या मतदान केंद्रावर मतदान करणारे ते पहिले मतदाता ठरले आहेत. त्यानंतर, त्यांनी राज्यातील जनतेला मतदानाचं आवाहन केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शहरांना, गावांना सुंदर बनवण्यासाठी मतदान करायला हवं, असे योगींनी यावेळी म्हटले.
राज्यातील ३७ जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका होत आहेत. या सर्वच ठिकाणी शांततेत मतदान पार पडेल. दरम्यान, आज ४ मे आणि ११ मे रोजी महापालिका व नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत आहे. त्यानंतर, १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. केवळ महापौर आणि नगरसेवकांसाठी ईव्हीएम मशिनद्वारे मतदान होत आहे. तर, इतर पदांसाठी बॅटोल पेपरवरुन मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात १० महापौर, ८२० नगरसेवक, १०३ नगरपालिका अध्यक्ष, २७४० नगरपालिका सदस्य, २७५ पंचायत समिती अध्यक्ष, आणि ३६४५ ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह एकूण ७,५९३ पदांसाठी ४४ हजारांपेक्षा अधिक उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. महापालिकेच्या १० नगरसेवकांसह एकूण ८५ जण आत्तापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत.