लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे सोमवारी निधन झाले. लॉकडाऊनमुळे योगी यांना वडिलांचे अखेरचे दर्शन घेणेही अशक्य होत आहे. आपण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार असून वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नसल्याचा निर्णय योगी यांनी घेतला आहे. याच बरोबर, त्यांनी कुटुंबीयांनाही लॉकडाऊनचे पालन करत कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडावा, असे सांगत आईला एक भावनिक पत्र लिहिले आहे.
योगींचे वडील आनंद सिंह बिष्त यांनी सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूचा निरोप मिळाला तेव्हा, योगी कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या एका महत्वाच्या बैठकीत होते. वडिलांचा निरोप मिळाल्यानंतरही ही बैठक सुरूच होती. याच वेळी येथील काही अधिकाऱ्यांनी योगी यांची वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाण्याची तयारीही केली. मात्र, योगी यांनी दिल्ली अथवा उत्तराखंड येथे जाणार नसल्याचे सांगितले.
अखेरचे दर्शन घेण्याची उत्कट इच्छा पण... -यासंदर्भात योगी यांनी एक पत्र लिहिले आहे. यात, आपल्याला वडिलांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांना अखेरचे पाहण्याची उत्कट इच्छा आहे. पण, जागतीक महामारीमुळे ते अशक्य होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. योगींनी लिहिलेले हे पत्र अत्यंत भावनिक आहे. तसेच त्यांनी आपल्या वैयक्तिक जिवनापेक्षाही कर्तव्याला अधिक महत्व दिले आहे.
आईला लिहिले भावनिक पत्र -या पत्रत योगी यांनी म्हटले आहे, की 'पूजनीय वडिलांच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. ते माझे जन्मदाता आहेत. आयुष्यात प्रामानिकपणा, कठोर परिश्रम आणि निस्वार्थ तसेच समर्पण भावाने लोक कल्यानाचे कार्य करण्याची शिकवन त्यांनी बालपणी मला दिली. अखेरच्या क्षणी त्यांचे दर्शन घेण्याची अत्यंत इच्छा होती. मात्र, जागतीक महामारी कोरोना व्हायरसविरुद्ध देश लढत आहे. त्यात उत्तर प्रदेशच्या २३ कोटी जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. मी अखेरचे दर्शन घेऊ शकलो नाही. लॉकडाऊन यशस्वी करणे आणि कोरोनाचा पराभव करण्याच्या योजनेमुळे मला अंत्यविधीला येणे शक्य होणार नाही. पूजनीय आई आणि पूर्वाश्रमीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो, की लॉकडाऊनचे पालन करून कमीत कमी लोकांनी अंत्यविधी पार पाडावा. पूजनीय वडिलांच्या स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम करत त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. लॉकडाऊननंतर दर्शनासाठी येईन.'