लखनऊ – केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रचारात भाषणादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तास प्रचारबंदीचे आदेश दिले आहेत. हे आदेश आज पहाटे 6 वाजल्यापासून लागू झालेत. मात्र योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये आयोगाला सांगताना त्यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे विधान केलं.
योगी आदित्यनाथ यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला 11 एप्रिलला पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी सांगितले की, 9 एप्रिल रोजी मेरठमध्ये मी केलेल्या भाषणावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्याचे कळाले. मात्र या विषयाची सुरुवात विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केली होती. आचारसंहितेचं उल्लंघन करत एका पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाने मुसलमानांना त्यांच्या पार्टीला समर्थन करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन केलं होतं. त्यासाठी देशाचा जबाबदार नागरिक म्हणून माझं कर्तव्य होतं की मी अशा लोकांचा पर्दाफाश करायला हवा.
बजरंगबलीवर माझी अटूट श्रद्धा – योगीकेंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात योगी आदित्यनाथ यांनी बजरंगबलीवरुन केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. योगी यांनी पत्रात नमूद केलं आहे की, बजरंगबलीवर माझी अतूट श्रद्धा आहे. जर कोणाला भिती वाटत असेल तर त्यासाठी मी माझी श्रद्धा सोडू शकत नाही.
मायावती यांनी 7 एप्रिल रोजी सहानपूर येथे भाषण केलं होतं. सपा-बसपा-रालोद यांच्या संयुक्त सभेत मायावती यांनी मुस्लिमांनी मतदान करताना आवाहन केलं होतं. त्यानंतर 9 एप्रिलच्या योगी आदित्यनाथ यांच्या सहानपूरजवळील मेरठच्या सभेत जर सपा-बसपाला अलीवर विश्वास असेल तर मला पण बजरंगबलीवर विश्वास आहे. इतकचं नाही तर सपा-बसपाच्या व्यासपीठावर हे लोक अली अली ओरडत असतात. हा हिरवा रंगाचा व्हायरस देशात पसरत आहे. मात्र यूपी या व्हायरसच्या कचाट्यात सापडणार नाही असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं.
भाजपा शिष्टमंडळ निवडणूक आयोगासमोर मांडणार बाजू उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आणलेल्या ७२ तास प्रचार बंदीवरुन केंद्रीय निवडणूक आयोगासमोर भाजपा आपलं म्हणणं मांडणार आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवी आणि जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत.