भाजपाने पुन्हा एकदा भोजपुरी स्टार रवी किशन यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून त्यांना गोरखपूरमधून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पक्षाच्या या घोषणेनंतर एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रवी किशन यांची फिरकी घेतली. "रवी किशनसारखा अभिनय करू नका, मतं मागा..." असं योगींनी स्थानिक जनत आणि भाजपा कार्यकर्त्यांना गमतीने म्हटलं आहे. याचा एक व्हि़डीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजपाने रवी किशन यांना यूपीच्या गोरखपूरमधून लोकसभेचे उमेदवार बनवले आहे. तिकीट जाहीर होताच खासदार रवी किशन यांनी प्रथम गोरखपीठ गाठून प्रार्थना केली आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेते गोरखपूरमध्ये आयोजित जाहीर सभेत पोहोचले. जिथे पुन्हा एकदा सीएम योगींचा मजेशीर अंदाज पाहायला मिळाला.
"रवी किशनसारखा अभिनय करू नका"
जाहीर सभेला संबोधित करताना सीएम योगी म्हणाले, "रवी किशन यांचा चित्रपट कोणी कोणी पाहिला ते सांगा. तुम्ही मोफत पाहिला की पैसे देऊन पाहिला? आता निवडणुकीनंतर मी म्हणतो, एक-दोन मोफत शोही करा. ठीक आहे ना? रवी किशन यांना पुन्हा उमेदवार करण्यात आलं आहे. तुम्ही सर्व सहमत आहात का?" ज्यावर जनतेतून 'हो' असा आवाज येतो. तेव्हा योगी म्हणतात, "तुम्हा सर्वांना रवी किशन बनून घरोघरी जाऊन मतं मागायची आहेत. पण रवी किशनसारखा अभिनय करू नका, मतं मागा. अभिनयासाठी ते आहेत."
तिकीट मिळाल्यानंतर भाजपा नेते रवी किशन म्हणाले की, मी शीर्ष नेतृत्वाचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी खूप खूप आभार मानतो. त्यांच्या आशीर्वादाने संस्थेने मला काशीनंतरच्या सर्वात हॉट सीटवरून दुसरी संधी दिली. त्यांचा हा विश्वास मी कायम ठेवेन. भाजपा 400 जागांवर विजयी होणार असून गोरखपूरची जागा इतिहास रचणार आहे. 2019 च्या निवडणुकीत रवी किशन यांनी सपा उमेदवार रामभुआल निषाद यांच्यावर 3 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. यावेळीही जनतेचे असेच प्रेम आपल्याला मिळेल आणि आपण विजयाची नोंद करू, अशी आशा रवी किशन यांनी व्यक्त केली.