पौडी गढवाल-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तीन दिवसांच्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी पौडी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर स्थित गुरु गोरखनाथ महाविद्यालयात त्यांचे गुरू महंत अवैद्यनाथ यांच्या मूर्तीचं अनावरण केलं. यावेळी सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या गुरुंना सन्मानित केलं.
पौडीच्या पंचूर गावात आपला जन्म झाला आणि यमकेश्वरच्या जवळच असलेल्या चमोटखालस्थित एका शाळेत इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याचं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या शालेय आठवणींना उजाळा दिला. आजही आपल्या शिक्षकांची आठवण येते पण ते आज आपल्यात नाहीत याचं दु:ख आहे असंही ते म्हणाले.
यमकेश्वर येथे झालेल्या सत्कार समारंभात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या शाळेतील शिक्षकांना शाल, मिठाई आणि देणगी दिली. यावेळी आपल्या भाषणात गुरु महंत अवैद्यनाथ यांची आठवण करून योगी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री योगी त्यांच्या मूळ गावी पाचूरला रवाना झाले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आणि त्रिवेंद्र सिंह रावत, पर्यटन मंत्री सतपाल महाराज, कॅबिनेट मंत्री धनसिंग रावत आणि स्थानिक आमदार रेणू बिश्त आणि चिदानंद मुनी मुख्यमंत्री योगींच्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्याचवेळी त्याच्या व्यासपीठावर ६ शिक्षक बसले होते, ज्यांनी योगींना शाळेत शिकवलं होतं.
दुसरीकडे, आपला मुलगा २८ वर्षांनी घरी परतल्याचं पाहून योगींच्या आई देखील खूप आनंदी पाहायला मिळाल्या. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या आईशीही चर्चा केली. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. योगींनी आपल्या मूळ घरी तब्बल २८ वर्षांनंतर रात्रभर मुक्काम केला. त्यानंतर आज सकाळी ते धाकटा भाऊ महेंद्र सिंह बिश्त यांच्या मुलाच्या मुंडण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते हरिद्वारला रवाना होणार आहेत.
५ वर्षांनी गाव आणि २८ वर्षांनी वडिलोपार्जित घरी पोहोचलेमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ५ वर्षांनंतर त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत आणि २८ वर्षांनी त्यांनी त्यांच्या मूळ घरी रात्र काढली. यापूर्वी उत्तराखंड निवडणुकीदरम्यान रितू खंडुरी यांच्या प्रचारासाठी ते त्यांच्या गावी गेले होते. सीएम योगी यांच्या वडिलांचे कोरोनाच्या काळात निधन झाले होते, परंतु ते त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.