उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका महिलेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 3 वर्षात महिलेने पंधराशे रुपये आणि एक सायकल घेऊन सुरू केलेला छोटा व्यवसाय (पॅकेजिंग इंडस्ट्रीज) आज तीन कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या महिलेच्या भावनेला आणि समर्पणाला सलाम करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही तिला गोरखपूर रत्न देऊन सन्मानित केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी इतर महिलांसाठी प्रेरणास्त्रोत कशा बनल्या हे जाणून घेऊया.
संगीता पांडे असं या महिलेचं नाव असून या गोरखपूरमधील झरणाटोला येथील रहिवासी आहेत. संगीता पांडे सांगतात की, माझे वडील आणि दोन्ही भाऊ लष्करात आहेत. मी सुरुवातीपासूनच खूप महत्त्वाकांक्षी आहे. प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयातून घेतल्यानंतर गोरखपूर विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावरच माझ्या घरच्यांनी माझे लग्न लावून दिले. लग्नानंतर मला वाटले की आता माझ्या इच्छा दाबल्या जात आहेत.
संगीता सांगतात की, एके दिवशी त्यांनी मिठाईच्या दुकानात वापरलेला बॉक्स पाहिला आणि तिथून विचार आला की हे बनवण्याचा व्यवसाय का सुरू करू नये. अनेक अडथळे आले, पण माझ्या मनात एक विश्वास होता. जेव्हा मी पहिल्यांदाच गोलघरच्या सर्वात प्रतिष्ठित दुकानात पोहोचले तेव्हा लोकांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले की, तुला हे कसे शक्य होईल, तू एक स्त्री आहेस. एके दिवशी दुकानाचा मालक म्हणाला की तू खूप मेहनत करतेस म्हणून मी तुला ऑर्डर देतो. त्यांचे हे शब्द मी आव्हान म्हणून घेतले.
बॉक्स तयार केले आणि पहिल्यांदा 20 बॉक्स घेऊन त्याच्या दुकानात गेले. त्यांना ते बॉक्स आवडले आणि तेव्हापासून आजतागायत मी तिथे बॉक्स पुरवत आहे. संगीता त्यांच्यासोबत सुमारे दीडशे महिलांना रोजगारही देत आहेत. मला सुरुवातीला सासरच्या मंडळींनी पाठींबा दिला नाही, खूप टोमणे मारले पण 1500 रुपये आणि सायकल घेऊन मी माझा प्रवास सुरू केला. संघर्ष केला आणि आता मी कोट्यवधींच्या व्यवसायाची मालकीण आहे असं संगीता यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"