CM Yogi : 'भाजपने इशारा दिल्यानेच राज्यात साडे चार वर्षात एकही दंगल नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 07:28 PM2021-10-17T19:28:22+5:302021-10-17T19:29:06+5:30
उत्तर प्रदेशात यापूर्वीच्या सरकारमध्ये दंगली होत, खोट्या तक्रारी आणि गुन्हे दाखल केले जात. मूर्तीकारांच्या मुर्ती विकल्या जात नव्हत्या, दिवे बनविणाऱ्यांचे दिवेही विकले जात नसत.
लखनौ - उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांची चाहुल लागली असून नेतेमंडळींच्या भाषणातून याची जाणीव होते. भाजपा नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातत्याने विकासकामे आणि सरकारच्या यशस्वीतेची माहिती वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे देताना दिसत आहेत. आता, उत्तर प्रदेशात गेल्या साडे चार वर्षात एकही दंगल झाली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी राज्याची ओळखच दंगलखोर अशी होती. मात्र, गेल्या 4.5 वर्षात एकही दंगल झाली नसल्याचं योगींनी म्हटलं.
उत्तर प्रदेशात यापूर्वीच्या सरकारमध्ये दंगली होत, खोट्या तक्रारी आणि गुन्हे दाखल केले जात. मूर्तीकारांच्या मुर्ती विकल्या जात नव्हत्या, दिवे बनविणाऱ्यांचे दिवेही विकले जात नसत. सणासुदीला अंध:कार असायचा. मात्र, गेल्या 4.5 वर्षात आपण पाहिलंच आहे, राज्यात एकही दंगल झाली नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
भाजपा सरकारने दंगलखोरांना पहिल्याच दिवशी इशारा दिला होता, जर दंगल कराल तर पुढील सात पिढ्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतील. योगींनी मागासवर्ग संमलेनात बोलताना राज्यात शांतता असल्याचे म्हटले. यापूर्वी 2017 च्या अगोदर राज्यात ज्या पक्षाचं सरकार होतं, तेही विकासाच्या बाता मारायचे, पण विकास केवळ त्यांच्याच घरचा झाला. स्वत:च्या कुटुंबीयांशिवाय त्यांना समाज आणि राष्ट्राची अजिबात काळजी नव्हती, असेही योगींनी म्हटले.
राज्यात मागील सरकारच्या काळात दंगली झाल्या, शांतता भंग झाली. पण, आता राज्य विकासाच्या मार्गावर असताना त्यांना हे पचनी पडत नाही, असा आरोप योगींनी केला आहे.