नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून गंभीर आरोप केले. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेत राहिलेली त्रुटी हे पूर्वनियोजित रक्तरंजित कटकारस्थान होते. यासाठी देश काँग्रेसला कधीही माफ करणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आणि पंजाब सरकार सीएम योगी बरसले -सीएम योगी म्हणाले, पंजाब सरकारने देशातील सर्वोच्च कार्यकारी असलेल्या पंतप्रधान मोदी यांची सुरक्षितता सुरक्षा प्रोटोकॉल (PM Modi Security Protocols) आणि ब्लू बुक नुसार सुनिश्चित करायला हवी होती. पंजाब सरकारने पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात सामान्य शिष्टाचार आणि प्रोटोकॉलचेही पालन केले नाही.
पंतप्रधानांच्या ताफ्यावर ड्रोननेही हल्ला होण्याची होती भीती -पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात आधीच गुप्तचर विभागाकडून माहिती मिळालेली होती. खलिस्तानी विचारांच्या लोकांचीही वक्तव्ये येत होती. पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी एक लाख लोक येणार असेही इंटेलिजेंस इनपुट होते. त्या लोकांना आधीपासूनच पर्यायी मार्गाची माहिती होती. पंतप्रधानांचा ताफा अशा ठिकाणी थांबवण्यात आला होता, जेथे ड्रोननेही हल्ला होऊ शकत होता. पंजाब सरकारने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
काँग्रेसने देशाची माफी मागावी -सीएम चन्नींनी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत केलेल्या हलगर्जीपणासंदर्भात प्रियांका गांधींना माहिती देणे निंदनीय आहे. हा एक प्रायोजित कट होता. काँग्रेस आणि पंजाब सरकार मिळून सुरक्षिततेसंदर्भात केवळ भारताच्या घटनात्मक तरतुदींचे उल्लंघनच करत नव्हते, तर देशाविरुद्ध कट रचत होते. या संपूर्ण प्रकारात काँग्रेसने देशाची माफी मागायला हवी, असेही योगी म्हणाले.