लखनऊ: आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक (UP Election 2022) होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण अधिक तापताना दिसत आहे. यातच आता योगी सरकारने दहावी पास मुलांसाठी एक मोठी योजना आणली आहे. यानुसार, सरकारकडून दहावी पास मुलांना २५ लाख रुपये देणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने बेरोजगारांसाठी स्वरोजगार योजना आणली आहे. मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजना असे या योजनेचे नाव असून, १८ ते ४० वर्षे वयोगटातील तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकते, असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजनेची माहिती अधिकृत संकेतस्थळ diupmsme.upsdc.gov.in यावर मिळू शकेल. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी १० वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये अर्ज करणारा उमेदवार डिफॉल्टर असायला नको. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० यादरम्यानचे असायला हवे, असे सांगितले जात आहे.
या योजनेत दोन प्रकारचे कर्ज वाटप केले जाणार
मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजनेमध्ये दोन विभाग करण्यात आले असून, इंडस्ट्रियल सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टरसाठी कर्ज वाटप करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार या दोन क्षेत्रांसाठी कर्जासाठी अर्ज करू शकतो. इंडस्ट्रियल सेक्टरसाठी या योजनेत २५ लाखांपर्यंत तर, सर्व्हिस सेक्टरसाठी १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अर्ज करणारा उमेदवार उत्तर प्रदेशमधील मूळ निवासी असायला हवा. अर्ज करताना या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय या योजनेला लाभ घेणारे उमेदवार पंतप्रधान रोजगार योजना आणि मुख्यमंत्री रोजगार योजना यांचा लाभार्थी असायला नको, असे सांगितले जात आहे.
कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?
मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने आधार कार्ड, स्कॅन केलेली स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, रहिवासाचा दाखला/प्रमाणपत्र तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करावयाची आहेत. दरम्यान, आताच्या घडीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तसेच आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्ष आणि विद्यमान योगी सरकार विविध क्लृप्त्या लढवत असल्याचे पाहायला मिळत आहे.