CNG Car Fire: वाढत्या उन्हामुळे देशाच्या विविध भागांत आगीच्या घटनाही झपाट्याने वाढत आहेत. अशाच उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या रविवारी मेरठ जिल्ह्यात धावत्या CNG कारला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आतील प्रवासी बाहेर पडण्याआधीच आगीने रौद्र रुप धारण केले आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत प्रवाशांचाही जागीच होरपळून मृत्यू झाला.
काय प्रकरण आहे:गाझियाबादहून हरिद्वारला जाणाऱ्या एका धावत्या सीएनजी कारला मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस स्टेशन परिसरात आग लागली. काही वेळातच आग इतकी वाढली की, कारमधील प्रवाशांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही आणि गाडीतील सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये ललित(20), त्याची आई रजनी(20), राधा(29) आणि कविता(50) यांचा समावेश आहे.
मेरठ ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश बहादूर यांनी सांगितले की, हा अपघात रविवारी रात्री 9 वाजता कंवर रोडवर झाला. कारला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कारमधील चारही प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
आग कशी लागली:एएसपी कमलेश बहादूर यांनी सांगितल्यानुसार, कारला आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. ही एक जुनी सीएनजी कार होती, ज्यामध्ये आफ्टर मार्केट सीएनजी किट बसवण्यात आले होते. या किटला आग लागून ही आग इंजिनपर्यंत पसरल्याचा अंदाज आहे.
सीएनजी गाड्यांना आग का लागते?कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) हा अत्यंत ज्वलनशील वायू आहे. त्याची थोडीशी गळतीही मोठी दुर्घटना घडू शकते. साधारणपणे, कंपनीने बसवलेल्या सीएनजी कारमध्ये योग्य ती सर्व काळजी घेतलेली असते. पण, नंतर बाजारातून सीएनजी लावलेल्या गाड्या तितक्या सुरक्षित नसतात. थोडे पैसे वाचवण्यासाठी लोक आफ्टर मार्केट एनजी किट लावतात. अनेकदा हे किट खराब असते किंवा ते बसवणारे मेकॅनिक तज्ञ नसतात. त्यामुळेच लोकल सीएनजी किटमुळे आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.