नवी दिल्ली : सलग दोन दिवस पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस महाग झाल्यानंतर गुरुवारी सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सीएनजीमध्ये प्रति किलोमागे ५० पैसे, तर पीएनजीमध्ये प्रति युनिट १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत आता ५९.०१ रुपये प्रतिकिलो झाली आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दोन्ही वेळा सीएनजीच्या दरात किलोमागे ६० पैशांनी वाढ करण्यात आली होती. पीएनजीचा पुरवठादार तसेच दिल्लीतील सीएनजीची किरकोळ विक्री करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने आपल्या वेबसाइटवर नवीन दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ही वाढ झाली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कमावले ८ लाख कोटीएकीकडे कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांचे उत्पन्न घटले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या तीन वर्षांत दरडोई वार्षिक उत्पन्न १.२६ लाख रुपयांवरून ९९,१५५ रुपयांपर्यंत खाली आले असताना सरकारने गेल्या तीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर कर (एक्साइज ड्यूटी) लादून सरकारने आठ लाख कोटींहून अधिक कमाई केली आहे.दिल्लीत आतापर्यंत सीएनजीच्या दरात किलोमागे ५.५० रुपयांनी वाढ झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी ६१.५८ रुपये प्रतिकिलो, तर गुरुग्राममध्ये ६७.३७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.
पेट्राेलनंतर CNG आणि PNGच्या दरातही वाढ; निवडणुकीनंतर सामान्यांना महागाईचे झटके
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 7:07 AM