राजकोट/ मेहसाना : सहकार क्षेत्र हे गुजरातच्या निवडणुकीचे अभिन्न अंग आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश भाग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या क्षेत्राला जोडलेला आहे. सप्टेंबरमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अहमदाबादेत सहकारातील २७०० नेत्यांशी संवाद साधला होता. सहकाराशी जोडले गेलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी या नेत्यांना केले होते.भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, अमित शहा यांनी प्रत्येक मतदारसंघातून १० हजार मते जोडण्यासाठी शहा यांनी सहकारातील या नेत्यांची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये सहकार क्षेत्रातील नेत्यांना व्यासपीठावर स्थान दिले जात आहे. राजकोटच्या रॅलीत गोंडल कृषी उत्पन्न समितीचे अध्यक्ष जयंतभाई सावजीभाई हे मोदींसोबत व्यासपीठावर होते.उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची लढत काँग्रेसचे जीवाभाई पटेल यांच्याशी होत आहे. एकीकडे पाटीदार समुदायाने भाजपची झोप उडविली असताना सहकार क्षेत्रातील नेत्यांचा भाजपला मोठा आधार वाटत आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते भाजपसाठी प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. यात राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष अजयभाई पटेल आदींचा समावेश आहे. गुजरातमध्ये ७६,००० सहकारी सोसायट्या आहेत. त्यांचा दूध, पशुधन, मत्स्यपालन, ग्राहक, सिंचन या क्षेत्रांशी संबंध येतो. गुजरात राज्य सहकारी बँकेवर २४ संचालक आहेत; पण यातील बहुतांश थेट भाजपशी संबंधित नाहीत. या संचालकांत भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
सहकार क्षेत्र आहे भाजपचा कणा, सहकारातील नेत्यांना भाजपकडून मानाचे पान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:22 AM