- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
विख्यात अभिनेते व अहमदाबाद (पूर्व)चे खासदार परेश रावल यांनी लोकसभेच्या शून्यप्रहरात आपल्या खास फिल्मी स्टाईलने देशातल्या कोचिंग क्लासेस व्यवसायाची जोरदार हजेरी घेतली. रावल म्हणाले, विविध क्षेत्रात झुंडशाहीच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या माफियांची वर्णने आजवर सर्वांनी ऐकली आहेत. त्या यादीत आता पालकांचे शोषण करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या दहशतवादाची भर पडली आहे. त्यांच्या विचित्र शोषणातून गरीब व मध्यमवर्गीय पालकांना भगवान काय रजनीकांतही वाचवू शकणार नाही. रावल यांनी अभिनेता रजनीकांतचा असा मजेशीर उल्लेख करताच सभागृहात हास्याची कारंजी उडाली.कोचिंग क्लासेसच्या समस्येचे विस्ताराने विवेचन करतांना रावल म्हणाले, भारतात बालवाडीच्या प्रवेशापासूनच पालकांच्या शोषणाला प्रारंभ होतो. प्रवेशासाठी लाखो रूपयांच्या देणग्या उकळल्या जातात. ज्यांच्यामुळे सरकारी शाळांची गुणवत्ता खालावली त्यापैकी अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसचा आग्रह करतात. क्लासेसमधे जाणाऱ्या मुलांना अधिक चांगल्या गुणांनी पास केले जाते. भारतात कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी, शैक्षणिक अर्हता अथवा गुणवत्ता लागत नाही.