लोकमत न्यूज नेटवर्कव्हिएन्ना : कोल माइन्स प्रॉव्हिडंट फंडाचे ईपीएफमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावाचे केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी जोरदार समर्थन केले आहे. या विलिनीकरणामुळे कामगारांचे हित अधिक सुरक्षित होणार असल्याचा दावा त्यांनी केला. प्रस्तावित विलिनीकरणाला कामगार संघटनांनी तीव्र विरोध चालविला आहे. त्याविरोधात पुढील महिन्यात ३ दिवसांचा संप संघटनांनी पुकारला आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गोयल यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफ ही देशातील सर्वांत मोठी संस्था आहे. या संस्थेने कोळसा खाणींच्या कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे कामही पाहायला हवे, असे मला वाटते. ईपीएफओकडे हस्तांतरण झाल्यानंतर प्रत्येक कामगाराचा सध्याचा हक्क सुरक्षित राहील. त्यातून कोणाही कामगाराचे नुकसान होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सूत्रांनी सांगितले की, कोल इंडिया लिमिटेड आणि सिंगारेनी कोलियरीज कंपनीच्या विविध उपकंपन्यांचे सुमारे पाच लाख कोळसा कामगार १९ ते २१ जून या तीन दिवसांच्या काळात संपावर जाणार आहेत.गोयल यांनी सांगितले की, कामगार संघटनांना ईपीएफचे फायदे समजावून सांगण्यासाठी आणखी काही व्यवस्था करावी लागेल, असे वाटते. हस्तांतरणाने कोल माईन्स प्रॉव्हिडंट फंडाचे व्यवस्थापन करणाऱ्या काही मोजक्या लोकांचे चराऊ कुरण हिसकावले जाणार आहे. कारण त्यांच्या हातातील सारे अधिकार निघून जाणार आहेत. माझ्या मते ईपीएफ ही सर्वाधिक चांगल्या पद्धतीने चालविली जाणारी संस्था आहे. तिच्यात विलीन होणे त्यामुळेच कामगारांच्या हिताचे आहे.गोयल म्हणाले की, कोल माइन्स प्रॉव्हिंडट फंडापेक्षा ईपीएफमध्ये जास्त परतावा मिळतो. हे हस्तांतरण देशाच्या, लोकांच्या आणि कामगारांच्या हिताचे आहे.
‘कोल माइन्स पीएफ’ला ईपीएफमध्ये आणणार
By admin | Published: May 13, 2017 12:16 AM