नवी दिल्ली: कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील काम ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये कोळशाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देशातील बराचसा भाग अंधारात बुडून जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय वीज प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, देशात कोळशापासून वीज निर्मिती करणारे १३५ प्रकल्प आहेत. यातील १६ प्रकल्पांमधील कोळशाचा साठा पूर्णपणे संपला आहे. तर जवळपास निम्म्या प्रकल्पांमध्ये (७२ प्रकल्पांमध्ये) केवळ ३ दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये एक आठवडा पुरेल इतका साठा बाकी आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण वीजेपैकी ७० टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते. कोळशापासून निर्माण होणारी उर्जा स्वस्त असते. त्यामुळे भारतात याच उर्जेचा वापर होतो.
वीज प्रकल्पात कोळशाची टंचाई; नेमकं कारण काय?कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थचक्र सुरळीत होऊ लागलं आहे. औद्योगिक उर्जेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोळशाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये खूप मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम कोळशाच्या आयातीवर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर वाढले आहेत. त्यामुळे वीज प्रकल्पांनी आयात कमी केली आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील कोळसा खाणींवर दिसू लागला आहे. कोळसा खाणींवरील दबाव वाढला आहे. देशातील कोळशाची किंमत कोल इंडियाकडून निश्चित केली जाते. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाची किंमत वाढली आहे. पण कोल इंडियानं देशातील कोळशाचा दर फारसा वाढवलेला नाही. कोळशाची किंमत वाढल्यास त्याचा थेट परिणाम वीजेच्या दरांवर आणि पर्यायानं अन्य उत्पादनांवर होईल.