नवी दिल्ली : पटियाला हाऊस कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतत समन्स पाठवल्यानंतर रुजिरा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तपासात सहभागी होण्यास कथितपणे नकार दिल्याबद्दल ईडीच्या अर्जावर पटियाला हाऊस कोर्टाने रुजिरा बॅनर्जीविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीला रुजिरा यांची चौकशी करायची आहे. यासाठी अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा यांना ईडीने अनेकवेळा समन्स बजावले आहे, मात्र सतत समन्स बजावूनही रुजिरा एकदाही ईडीसमोर हजर झाली नाही. त्यामुळे आता ईडीने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी ईडीने आतापर्यंत दोनदा अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी केली आहे. या अवैध व्यवसायातून मिळालेल्या पैशाचे लाभार्थी अभिषेक बॅनर्जी असल्याचा दावा ईडीने यापूर्वी केला होता. मात्र, अभिषेक बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.