पाचवरून संख्याबळ नऊ होणारनाशिक : आगामी ४ ऑक्टोबरला होणार्या जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदासाठी निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ अचानक चारवरून नऊवर जाण्याची शक्यता बळावली आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे चार समर्थक जिल्हा परिषद सदस्यही भाजपाच्या गोटात जाण्याची शक्यता आहे.आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे समर्थकही साहजिकच भाजपावासी होणार आहेत. जिल्हा परिषदेत सिन्नर तालुक्यातून आमदार माणिकराव कोकाटे समर्थक चार, तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यातच कोकाटे समर्थक चारपैकी राजेश नवाळे यांना मागील अडीच वर्षांत कॉँग्रेसकडून समाजकल्याण सभापतिपदी संधी मिळाली आहे. तसेच दुसरे समर्थक केरू पवार यांनाही उपाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसने संधी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रकाश वडजे यांनी त्यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत केले होते. आता आमदार माणिकराव कोकाटे भाजपात गेल्याने त्यांचे समर्थक सदस्य माजी सभापती राजेश नवाळे, केरू पवार, शीला गवारे व ताईबाई गायकवाड हे चारही सदस्य भाजपात जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भाजपाचे केदा अहेर, कलावती चव्हाण, सुनीता पाटील व मनीषा बोडके हे चार, तर अद्वय हिरे हे भाजपात गेल्याने त्यांच्या जनराज्य पक्षाकडून निवडून आलेल्या स्वाती पवन ठाकरे याही भाजपावासी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाची संख्या पाच झालेली असतानाच आता आमदार माणिकराव कोकाटे भाजपात गेल्याने त्यांचे चार समर्थकही भाजपावासी झाले तर भाजपाची संख्या आता नऊ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विषय समिती सभापतिपदासाठी भाजपाकडून उमेदवारी घेऊन प्रसंगी बांधकाम व अर्थ समिती सभापतिपदासाठी जोरदार लॉबिंग होऊ शकते. (प्रतिनिधी)
युतीचा काडीमोड भाजपाच्या पथ्यावर
By admin | Published: September 25, 2014 11:03 PM