नवी दिल्ली : रालोआ सरकार गरीब आणि शेतकरी समर्थक असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. सरकारची धोरणे कॉर्पोरेटधार्जिणी असल्याचा आरोप खोडून काढताना त्यांनी विरोधकांना भाजपवर टीका करण्याची जन्मजात सवयच असल्याचा टोलाही हाणला.एकीकडे राहुल गांधी शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित असताना दुसरीकडे मोदींनी पक्षखासदारांची कार्यशाळा बोलावली होती. मात्र भूसंपादन विधेयकाविरुद्ध काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘किसान रॅली’चा कुठलाही संदर्भ न देता त्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा उल्लेख केला. शेतीचे ५० टक्के नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय बदलवत आता केवळ ३३ टक्क्यांचा निकष लावण्यात आला आहे. या महिन्याच्या प्रारंभी बेंगळुरू येथील राष्ट्रीय अधिवेशनात दिलेले भाषण मीडियातील काही घटकांनी चुकीच्या पद्धतीने समोर आणले. त्यामागे काही दूषित विचार करणारे लोक आहेत, असा भूसंपादन विधेयकाचा अप्रत्यक्ष संदर्भही त्यांनी दिला. माझ्या हृदयाजवळ केवळ गरिबांचे कल्याण हीच बाब आहे. पक्षाचे खासदार आणि कार्यकर्त्यांनी जनतेकडे जाऊन याआधीचे संपुआ सरकार आणि विद्यमान रालोआ सरकारने गरिबांसाठी केलेल्या कार्यातील फरक स्पष्ट करावा, असे आवाहनही त्यांनी केले. गरिबांकडे रुपयापैकी केवळ १५ पैसे पोहोचतात, असे विधान माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी केले होते. त्याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, तुम्हाला केवळ विश्लेषण करायचे नाही. आजारावर इलाज करायचा आहे. सोमवारपासून संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होत असताना त्यांनी खासदारांच्या या बैठकीत मोदी सरकारने १० महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या योजना अधोरेखित केल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
युतीचे सरकार शेतकरी, गरिबांचे समर्थक - मोदी
By admin | Published: April 20, 2015 3:32 AM