नवी दिल्ली : सातत्याने होत असलेल्या खोट्या, निराधार, बदनामीकारक आणि वैयक्तिक हल्ल्यांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी कंपनीला रामराम ठोकला. विशेष म्हणजे, कंपनीचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना कंटाळून सिक्का यांनी राजीनामा दिला असल्याचे कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.दोन लाखांहून अधिक कर्मचारी असलेल्या इन्फोसिसच्या नवीन एमडी आणि सीईओंची नियुक्ती आता ३१ मार्च २0१८ पर्यंत करण्यात येणार आहे. तोपर्यंत विद्यमान परिचालन अधिकारी प्रवीण राव यांची हंगामी सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली. कंपनीचे काम सुरळीत चालावे, यासाठी सिक्का काही काळ कार्यकारी उपाध्यक्षपदी राहतील. वार्षिक १ डॉलर वेतनावर ते नव्या सीईओचा शोध घेण्यास मदत करणार आहेत.सिक्का यांनी राजीनाम्यात मूर्ती यांचे नाव घेतले नाही. नारायणमूर्ती यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे. त्यांनी म्हटले की, या हल्ल्यांमुळे आपण व्यथित झालो आहोत. निराधार आक्षेपांना उत्तरे देणे आपल्या सन्मानाला शोभणारे नाही.
सिक्का यांचा इन्फोसिसला रामराम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 6:12 AM