बेतिया – बिहारच्या बेतिया इथं काही वर्षापूर्वी एका मुलीनं खेळण्याच्या नादात एक नाणं गिळलं होतं. त्यावेळी या मुलीला काही झालं नाही. परंतु घटनेला ४ वर्ष उलटल्यानंतर आता मुलीची तब्येत अचानक बिघडू लागली. तेव्हा डॉक्टरांनी या मुलीची तपासणी केली असता तिच्या छातीत नाणं अडकल्याचं दिसून आले. या नाण्यामुळेच मुलीची तब्येत खराब झाली आहे. डॉक्टरांनी ऑपरेशननंतर मुलीच्या छातीतून नाणं बाहेर काढून तिचा जीव वाचवला आहे.
नरकटियागंजच्या टोली गावात राहणाऱ्या ८ वर्षीय मुलगी सुषमानं खेळता खेळता चुकीनं नाणं गिळलं होतं. जे नाणं मुलीच्या छातीत जाऊन फसलं. ज्यावेळी हे नाणं फसलं तेव्हा तिला काहीच जाणवलं नाही. घरच्यांना शौचालयाच्या वाटे हे नाणं बाहेर पडलं असावं असं वाटलं. परंतु आता मुलीची तब्येत बिघडू लागल्याने नातेवाईकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. नेमकं या मुलीला काय झालं? यासाठी डॉक्टरांनी एक्स रे काढण्याचा सल्ला दिला.
एक्स रे रिपोर्ट समोर आल्यानंतर डॉक्टरांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला. मुलीच्या छातीत नाणं अडकल्याचं दिसून आले. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीचा जीव वाचवण्यासाठी ऑपरेशनची गरज आहे असं सांगितले. परंतु नातेवाईकांची आर्थिक स्थिती ठीक नसल्यानं मुलीच्या उपचारासाठी भटकत राहिले. त्यानंतर इतरांकडून १७ हजारांचे कर्ज घेऊन मुलीचं ऑपरेशन केले. ज्यात मुलीच्या छातीतून अडकलेलं नाणं बाहेर काढलं. रिपोर्टनुसार, तिच्या शरीरात २ रुपयांचे नाणं अडकले होते. या घटनेबाबत पीडित मुलीचे वडील राजकुमार साह म्हणाले की, मुलीच्या छातीत ४ वर्षापूर्वी नाणं अडकले होते. जेव्हा आम्ही डॉक्टरांना भेटलो तेव्हा त्यांनी हे नाणं अजूनही छातीत असल्याचं दाखवले. त्यानंतर ऑपरेशन करून ते नाणं बाहेर काढण्यात यश आले. यासाठी १७ हजारांचा खर्च आल्याचं कुटुंबीयांनी सांगितले.