मुंबई - बॉलीवूडमधील महिला सुपरस्टार म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईमध्ये आकस्मिक निधन झाले. श्रीदेवी यांचे निधन अनेकांना चटका लावून गेले आहे. दरम्यान, बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर आणि दुसरी पत्नी श्रीदेवी यांच्या मृत्युमध्ये एक अजब आणि मनाला चटका लावणारा योगायोग दिसून आला आहे. बोनी कपूर यांची पहिली पत्नी आणि अभिनेता अर्जुन कपूर याची आई मोना शौरी-कपूर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले होते. तर बोनी कपूर यांची दुसरी पत्नी असलेल्या श्रीदेवी यांचे काल रात्री निधन झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे मोना आणि श्रीदेवी यांच्या मृत्यूमध्ये एक विचित्र योगायोग दिसत आहे. मोना कपूर यांचे निधन त्यांचा मुलगा अर्जुन कपूर याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच झाले होते. तर श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर हिचा धडक हा पहिला चित्रपट काही महिन्यांनंतर प्रदर्शित होणार असून, त्याआधीच श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अर्जुन कपूरचा इश्कजादे हा चित्रपट मे 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वीच मार्च 2012 मध्ये मोना कपूर यांचा मृत्यू झाला होता. तर जान्हवी कपूर हिचा पहिला चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे मात्र आपल्या मुलीचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवींना मृत्यूने कवटाळले आहे. श्रीदेवी यांचा जीवन प्रवास -
श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते. श्रीदेवी यांना एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवी यांची झलक दिसली होती. पण त्या या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हत्या. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या. 1996 मध्ये निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट....जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.