बंगळूर : नोटाबंदीच्या काळात कर्नाटकात मोठ्या प्रमाणात रोख रकमा पकडण्यात आल्या. यातील ७0 टक्के नोटा परराज्यांत वितरीत करण्यात आलेल्या सिरिजमधील होत्या, अशी माहिती समोर आली आहे. काळा पैसा पांढरा करणारे मोठे रॅकेट होते, हे यावरून स्पष्ट होते.कर्नाटकात पकडण्यात आलेल्या नोटा चेन्नई, हैदराबाद, विजयवाडा, अहमदाबाद आणि सुरत या शहरांसाठी वितरीत झालेल्या सिरिजमधील होत्या. २५ डिसेंबरपर्यंत देशभरात ३,५00 कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्यातील १00 कोटी रुपये २ हजारांच्या नोटांत होते. त्यापैकी ५५ प्रकरणे चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक २६ प्रकरणे कर्नाटकाची आहेत. जप्त करण्यात आलेल्या नोटांची प्राथमिक तपासणीतून असे निदर्शनास आले की, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि गोवा या राज्यांत रॅकेट कार्यरत होते. उदाहरणच द्यायचे, तर तामिळनाडूचे देता येईल. तामिळनाडूचे मुख्य सचिव राम मोहन राव यांचा मुलगा पी. विवेक याच्या बंगळुरातील घरातून जप्त केलेले २३ लाख रुपये चेन्नई येथील कोषागारातील होते. बंगळुरातील मनीलाँडरिंग प्रकरणात तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य जे. शेखर रेड्डी आणि चित्तुरचे माजी खासदार आदिकेशवुलु नायडू यांचा भाऊ डी. के. बद्रिनाथ यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी फिरविलेल्या बहुतांश नोटा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतील होत्या. खाण सम्राट जी. जनार्दन रेड्डी यांना साह्य करणारा भीमा नायक याच्याकडून जप्त झालेले १00 कोटी रुपये आंध्र प्रदेशातून बंगळुरात पाठविण्यात आले होते. गोव्यातील रॅकेट यापेक्षा वेगळे होते. गोव्यातील रॅकेटमध्ये अनेक कसिनो मालकांचा समावेश होता. जेडीएस नेते के. सी. वीरेंद्रच्या घरातून ५.७ कोटी रुपये जप्त केले होते. (वृत्तसंस्था)
कर्नाटकात पकडलेल्या नोटा अन्य राज्यांमधील
By admin | Published: December 30, 2016 12:44 AM