जयपूर/जम्मू : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, विशेषत: राजस्थान, बिहारचा काही भाग आणि जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. काश्मीरच्या अनेक भागांत पारा शून्याखाली उतरला आहे. बिहारमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेली थंडीची लाट कायम असून, राजस्थानात हा प्रकोप अधिक जाणवत आहेत. दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांत चक्रीवादळामुळे थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी झाला आहे.
हवामानशास्त्र विभागानुसार रविवार-सोमवारी राजस्थानात हवा कोरडी राहील आणि थंडीचा कडाका अधिक वाढेल. रविवारी माऊंट आबूमध्ये सर्वांत कमी ७.४ अंश तापमान नोंदवले गेले.
बहुतांश काश्मीर गोठले, तापमान शून्याखाली
शनिवारी काही भागांत झालेल्या बर्फवृष्टीनंतर काश्मीरमध्ये रविवारी दिवसभर दाट धुक्याचे साम्राज्य होते. त्यामुळे अनेक भागांत पारा शून्याखाली उतरला, तर दृश्यमानता ५० मीटरवर आली.
श्रीनगरमध्ये उणे १.३ अंश तापमान हाेते. परिसरात बहुतांश भागांमध्ये शनिवारी रात्री पारा शून्याखाली होता. गुलमर्गमध्ये उणे २.६, पहलगाममध्ये उणे ०.३, तर काजीगुंडमध्ये उणे १.८ अंश तापमानाची नोंद झाली.