लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरात थंडीची हुडहुडी भरू लागली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या हिमवृष्टी सुरू आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, आदी राज्यांमध्ये थंडीमुळे तापमान खाली घसरले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी तापमान सामान्य पातळीपेक्षा खाली घसरत असून, थंडीचा जोर वाढला आहे.
पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये थंडीच्या लाटेबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट, तर दिल्लीसाठी यलो अलर्ट दिला आहे. येत्या चार-पाच दिवसांत दिल्लीतील तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नाताळनंतर दिल्लीमध्ये थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात या शहराचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्लीत शनिवारपासून ते येत्या बुधवारपर्यंत तापमान सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर. चंबळ, भोपाळ. उज्जैन, शाजापूर, राजगढ, नीमच, मंदसौर, आदी भागांमध्ये येत्या आठवड्यात सर्वत्र मध्यम प्रमाणात धुक्याचे साम्राज्य पसरण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे तिथे अनेक ठिकाणी रात्री तापमान शून्याच्या खाली घसरले आहे. विविध राज्यांच्या सरकारांनी काही उपाययोजना केल्या आहेत. बेघर तसेच निराश्रित लोकांना पांघरूण, घोंगड्या, गरम कपडे वाटपाचे कार्यक्रमही स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतले आहेत.
राजस्थानात थंडीच्या लाटेचा इशारा
येत्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात थंडीचे प्रमाण आणखी वाढू शकते. राजस्थानमधील चुरू, सीकर, हनुमानगढ, झुंझुनू या जिल्ह्यांत आज, रविवारपर्यंत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.