चंडीगड : पंजाब आणि हरयाणामध्ये थंडीची लाट कायम असून, अनेक ठिकाणी पारा ५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. दोन्ही राज्यांच्या अनेक भागांत सकाळी धुकेही पाहायला मिळाले. हरयाणातील नारनौल हे शनिवारी किमान ३ अंश सेल्सिअस तापमानासह सर्वांत थंड ठिकाण होते, असे येथील हवामान विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
अंबाला येथे थंडीची चाहूल लागली असून, शहरातील किमान तापमान ६.३ अंश सेल्सिअस आहे. कर्नालमध्ये पारा ५.७ अंश सेल्सिअसवर स्थिरावला. हिसार येथे किमान तापमान ३.६ अंश सेल्सिअस तर रोहतक, भिवानी आणि सिरसा येथे अनुक्रमे ५.४, ३.५ आणि ६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पंजाबमध्येही थंडीची लाट कमी झाली नाही.
अमृतसर, लुधियाना आणि पतियाळा येथे अनुक्रमे ७.२, ४.९ आणि ५.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. गुरुदासपूरमध्ये ३.८ अंश सेल्सिअस, पठाणकोटमध्ये ६.६ , भटिंडामध्ये ४.५ , फरीदकोटमध्ये ५ आणि एसबीएसनगरमध्ये ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंडीगडमध्ये ६.८ अंश तापमान नोंदवले गेले.
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. या हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात थंड सकाळची नोंद शनिवारी दिल्लीत झाली. किमान तापमान ३.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. धुक्यामुळे दिल्लीहून निघणाऱ्या किंवा पोहोचणाऱ्या १८ रेल्वे १ ते ६ तास उशिराने धावत आहेत. हरयाणाच्या हिसारमधील बलसमंद येथे किमान तापमान ०.४ अंश नोंदवले गेले.
पाटण्यात सर्व शाळा १६ जानेवारीपर्यंत बंदउत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पारा ३.० अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, चंडीगड, हरयाणामध्ये धुके तसेच थंडीची लाट आणि दव पडण्याचा इशारा आहे. तसेच बिहारमध्ये थंडी लक्षात घेता पाटण्यात आठवीपर्यंतच्या सर्व शाळा १६ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. तसेच मधुबनी जिल्ह्यातील पाचवीपर्यंतच्या शाळा १६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.