नवी दिल्ली : सन २०२० वर्ष सरताना थंडीचा जोरदार कहर संपूर्ण देशभरात असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर भारतासह देशातील अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेला आहे. नव्या वर्षातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. या भागात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेला असून, चहुबाजूला बर्फाची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. डलहौजी भागात ४ फूट बर्फवृष्टी झाली. पर्यटकांसाठी ही पर्वणी असली, तरी अनेक ठिकाणी बर्फवृष्टीमुळे मार्ग बंद झाल्याची माहिती मिळत आहे. शिमला, सोलन, पटनीटॉप, बटोटे आणि अन्य ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याचे समजते.
राजस्थानातील माउंट अबू भागातील तापमान उणे ४ अंशांवर गेले आहे. माऊंट अबू भागातही बर्फाची चादर पसरली आहे. मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेल्यामुळे शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला आहे. चणे, गहू, मेथी, बटाटे अशा पीकांचे नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही थंडीची लहर कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचे समजते.
राज्यातही हुडहुडी
मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १५ अंश नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हा आतापर्यंतचा नीचांक आहे. विशेषत: कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. घसरलेल्या तापमानामुळे रात्री, पहाटे आणि दुपारीही येथील वातावरणात गारवा जाणवत आहे. मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या तापमानानुसार माथेरानपेक्षा मुंबई अधिक थंड आहे. माथेरानचे किमान तापमान १७ तर मुंबईचे १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यात तापमानात घसरण नोंदविण्यात येत आहे. ठाणे, नवी मुंबई, बीकेसी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, चारकोप, बोरीवली, विद्याविहार, पवई, मुलुंड, नेरूळ आणि पनवेल येथे किमान तापमान १५ अंश नोंदवले गेले.