श्रीनगर : कारगिलसह संपूर्ण काश्मीर खोऱ्यात रात्रीचे तापमान आणखी घसरून गोठणबिंदूच्या खाली गेले, तर दिवसाच्या तापमानात वाढ झाली असून, ते यावर्षी पहिल्यांदाच सामान्य पातळीच्या वर स्थिरावले आहे. राज्यात कारगिलमध्ये सर्वाधिक थंडी होती. तेथे किमान तापमान शून्याहून १५.८ अंश सेल्सिअस खाली होते. कमाल तापमानात वाढ होऊन काश्मीरच्या बहुतांश भागात पारा यंदा प्रथमच नेहमीच्या सामान्य पातळीहून अधिक राहिला. तथापि, कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशामुळे काल रात्री किमान तापमान गोठणबिंदूच्या आणखी खाली आले. श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे ३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. काल रात्री ते उणे १.२ अंश होते. कमाल तापमान ११.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ते वर्षातील या वेळच्या सामान्य तापमानाहून ३ अंश सेल्सिअसने अधिक आहे. दक्षिण काश्मिरातील पहलगाम येथील रात्रीचा पारा उणे ५.४ अंश सेल्सिअसने घसरून उणे ९.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. उत्तर काश्मिरातील प्रसिद्ध स्की-रिसार्ट गुलमर्ग येथे उणे ९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आदल्या रात्री ते उणे ९ अंश सेल्सिअस होते. त्याचप्रमाणे काल येथील कमाल तापमान सामान्य पातळीच्या वर ४.६ अंश सेल्सिअस होते. खोऱ्याचे प्रवेशद्वार म्हणवल्या जाणाऱ्या काजीगुंडमध्ये किमान तापमान उणे ४.२ अंश आणि कोकरनाग येथे २.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कुपवाडात किमान तापमान उणे ५.१ अंश सेल्सिअस आणि लेहमध्ये उणे १४.७ अंश सेल्सिअस होते. पुढील आठवड्यातही खोऱ्यात हवामान कोरडे राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फुटीरवाद्यांच्या प्रस्तावित मोर्चाच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने शहराच्या काही भागांत लागू जमावबंदीचे आदेश शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही कायम ठेवले. अफझल गुरूच्या फाशीला चार वर्षे झाल्यानिमित्त फुटीरवाद्यांनी गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे शहराच्या विविध भागांत काल जमावबंदी लागू करण्यात आली होती. फुटीरवादी शुक्रवारी शहरातील लाल चौक आणि संयुक्त राष्ट्राच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्यामुळे प्रशासनाने जमावबंदीचे आदेश कायम ठेवले.
काश्मीरमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढला
By admin | Published: February 11, 2017 1:11 AM