नवी दिल्ली : गेल्या चार दिवसात दिल्लीत थंडीने कहर केला आहे. इथले किमान तापमान ३.६ अंशांपर्यंत घसरले आहे. थंडीची ही लाट काही दिवस कायम राहील. उत्तर-पश्चिम भारतातील पठारी भागात हाडे गारठवणारी थंडी वाढली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत लोक हादरले आहेत.
उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दिल्लीत रविवार हा हंगामातील सर्वात थंड दिवस नोंदवण्यात आला. कडाक्याच्या थंडीत किमान तापमान ४.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून ते सामान्य तापमानापेक्षा ३ अंश सेंने कमी आहे. त्याच वेळी कमाल तापमान १९.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, जे सामान्यपेक्षा तीनने कमी आहे. पंजाबपासून राजस्थानपर्यंतच्या भागात पुढील दोन दिवस थंडीची लाट राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दिल्ली येथील लोधी रोड हे ३.६ अंश सेल्सिअस इतके थंड ठिकाण होते. याशिवाय सफदरजंग ४.६, पालम ५.८ आणि आयानगर हे ५ अंश सेल्सिअस असलेले सर्वात थंड क्षेत्र होते. पंजाब, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पूर्व आणि पश्चिम भागात पुढील दोन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
राजस्थान, पंजाब, हरयाणात कहर
राजस्थानात चुरू आणि सीकरसह बहुतांश भागात पारा शून्याखाली घसरला आहे. पंजाब, हरयाणात सोमवारी थंडीने कहर केला. हिसारमध्ये तापमान ०.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. अंबालात ५.१, नारनौल १.३, रोहतक २.६, कर्नाल ३.४, सिरसा ३.२, फतेहाबाद ३.१, भिवानी २.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदण्यात आले. ओडिशात १३ ठिकाणी सोमवारी तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. कोलकातासह प. बंगालमध्ये थंडी वाढली आहे. दार्जिलिंगमध्ये किमान तापमान ३.५ अंश सेल्सिअस होते.
श्रीनगर : उणे ५.८
काश्मिरात श्रीनगरमध्ये तापमान उणे ५.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गुलमर्ग रिसॉर्टमध्ये किमान तापमान उणे ५.५ अंश सेल्सिअस होते.