नवी दिल्ली : काश्मीरसह पंजाब, हरयाणा, राजस्थानातील बव्हंशी भागात थंडीची लाट पसरली असून, अनेक ठिकाणी पारा चांगलाच उतरल्याने जनजीवन गारठले आहे. श्रीनगरमध्ये कालची रात्र या मोसमातील सर्वाधिक थंड होती. येथील तापमान शून्याखील घसरत ४.३ अंश सेल्शिअसवर होते. गुलमर्गमध्येही पार उणे १०.२ अंशावर होता. कडाक्याच्या थंडीने श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी जलवाहिन्या थिजल्या आहेत.
हरयाणातील नारनौल येथील किमान तापमान बुधवारी ३.२ अंश सेल्शिअसवर पोहोचले. पंजाब, हरयाणात पुढील दोन दिवस थंडीचा कहर असेल, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. हरयाणातील कर्नाल, रोहतक, भिवानी, सिरसा, अंबाला, तसेच पंजाबमधील फरिदकोट, लुधियाना, पटियाला, भटिंडा, अमृतसरसह चंदीगडमध्ये थंडीची लाट आहे. या सर्वठिकाणचे किमान तापमान सरकारी ५ ते ७.२ अंश सेल्शिअसदरम्यान नोंदले गेले. गेल्या काही वर्षांत एवढी थंडी कधीच अनुभवली नाही, असे येथील वयोवृद्ध रहिवासी बलदेव सिंग यांनी सांगितले.दिल्लीतील किमान तापमान ६ अंश सेल्शिअवर घसरले होते. राजस्थानमधील सिकर हे सर्वाधिक थंडीचे ठिकाणी ठरले. येथील किमान तापमान बुधवारी २.५ अंश सेल्शिअसवर पोहोचले. पिलानील, चुरू, जैसलमेर, गंगानगर येथील किमान तापमान ४ ते ५.८ अंश सेल्शिअसदरम्यान नोंदले गेले. बिकानेर, जयपूर, अजमेर, जोधपूर येथील रात्रीचे तापमान ६ ते १२ अंश सेल्शिअसदरम्यान नोंदले गेले.