पलक्कड : विशिष्ट समुदाय किंवा जातींची माहिती गोळा करण्यावर आमचा आक्षेप नाही. ही माहिती या वर्गांचे कल्याण करण्यासाठी वापरली जावी. निवडणुकीत राजकीय हत्यार म्हणून उपयोग करू नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.
रा. स्व. संघाची तीन दिवसांची समन्वय बैठक संपल्यानंतर संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, जाती व जात-संबंध हा देशाचे ऐक्य व अखंडतेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याबाबत काळजीपूर्वक पावले उचलावीत. या समुदाय किंवा जातींच्या गोळा केलेल्या माहितीचा उपयोग त्यांच्या विकासासाठी करावा. निवडणुकांत विजय मिळविण्यासाठी वापर होऊ नये. जातनिहाय गणनेची काँग्रेस, समाजवादी पक्ष व इंडिया आघाडीतील अन्य घटक पक्षांनी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघाने आपली भूमिका मांडली. (वृत्तसंस्था)
पश्चिम बंगालमधील घटनेचा केला निषेध - पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व तिची हत्या या अमानुष घटनेचा रा. स्व. संघाने निषेध केला आहे. - महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी विद्यमान कायद्यांचा फेरविचार करून योग्य तरतुदी कराव्यात, अशी मागणी संघाने केली. - शाळा, महाविद्यालयीन स्तरावर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात यावेत, अशीही मागणी संघाने केली.