लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आम आदमी पार्टीने बेहिशेबी देणग्या गोळा केल्या. केजरीवाल यांच्या जवळच्या लोकांच्या बनावट कंपन्यांतून ‘आप’ला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. अरविंद केजरीवाल हे भ्रष्ट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी रविवारी आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला. मिश्रा बुधवारपासून उपोषणाला बसले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेच्या अखेरीस भोवळ आल्याने त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलविण्यात आले. येथे एका पत्रकार परिषदेत कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि पक्षावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केला. आपच्या पाच नेत्यांच्या विदेश दौऱ्याचा तपशील देण्यास आपने नकार दिल्याच्या निषेधार्थ मिश्रा हे उपोषणाला बसले आहेत. शिवचरण गोयल आणि नरेश यादव यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, केजरीवाल यांच्या जवळच्या लोकांच्या बनावट कंपन्यांतून आपला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. आपला मिळालेला निधी आणि निवडणूक आयोगाला याबाबत देण्यात आलेली माहिती यात विसंगती असल्याचे त्यांनी सांगितले. मिश्रा यांचे आरोप आपने फेटाळले असून, मिश्रा हे भाजपच्या तोंडची भाषा बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. ...तर मुख्यमंत्र्यांची कॉलर पकडू मिश्रा म्हणाले की, जर केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही तर, मुख्यमंत्र्यांची कॉलर पकडून तिहारमध्ये नेऊ. मिश्रा हे दस्तऐवज सादर करणार होते. तत्पूर्वीच ते भोवळ येऊन पडले. पक्षाने ४६१ बनावट नोंदी केल्या. काय होत आहे याची अरविंद केजरीवाल यांना कल्पना होती. या बनावट कंपन्यांनी २०१४ मध्ये एकाच दिवशी एकाच वेळी आपच्या खात्यात रक्कम जमा केली. आपला २०१४-१५ आणि २०१५-१६ साठी प्रिया बंसलकडून ९० लाखांचा निधी मिळाला होता; पण त्यांच्या उत्पन्नावरील देय कर फक्त ४००० रु. होता. आपच्या खात्यात ६५.५ कोटी असताना निवडणूक आयोगाला ३२.४ कोटी रु. असल्याचे सांगितले. २७.३ कोटींचा हिशेब असताना कार्यकर्त्यांना मात्र पैसेच नसल्याचे सांगितले गेले.
‘आप’ने बेहिशेबी देणग्या गोळा केल्या
By admin | Published: May 15, 2017 12:22 AM