भोपाळ - मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी स्वरोचिष सोमवंशी यांनी आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कार्यालयातील एसी (एअर कंडिशनर) काढून चक्क उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या चिमुकल्यांच्या केंद्रात बसवले आहेत. पोषण पुनर्वास केंद्र (एनआरसी) येथे उकाड्यामुळे लहान मुलांना त्रास होत होता. त्यामुळे समोवंशी यांनी आपल्या रुम आणि कार्यालयातील एसी तेथे बसविण्याचे आदेश दिले.
एनआरसी केंद्रात दाखल असलेल्या लहान मुलांसह त्यांच्या पालकांना उकाड्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. या एनआरसी केंद्रात केवळ फॅनची हवा चालत होती, पण बाहेरील उन्हाच्या तडाक्यामुळे हॉलमधील वातावरण गरम झाले होते. याबाबत आम्ही एनआरसीमधील परिस्थिती पाहिल्यानंतर तेथे एसी बसविण्याचं ठरवलं. मात्र, तात्काळ एसी बसवणे गरजेचे असल्याने आम्ही रुम आणि कार्यालयातील एसी काढून तेथे बसविण्याचा निर्णय घेतल्याचे सोमवंशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे या एनआरसी ब्लॉकमध्ये चार केंद्र आहेत, सोमवंशी यांच्या प्रयत्नाने या चारही केंद्रांवर एसी बसविण्यात आले आहेत.