रायपूर - छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात लॉकडाउन लागू आहे. यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी एका युवकाला कोरोना नियमांकडे दूर्लक्ष केल्याने कानशिलात लगावल्याचा आणि त्याचा मोबाईल फोडल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर पोलिसांनीही त्याला मारले. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच आरेरावी करणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कृत्यासाठी माफी मागीतली.
सूरजपूर जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचे नाव अमन मित्तल (23) असे आहे. त्याच्या विरोधात लॉकडाउनचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा शनिवारी दुपारी जिल्ह्यातील स्थितीची पाहणी करण्यासाठी फिरत होते. याच दरम्यान त्यांनी रस्त्यावरून जात असलेल्या एका मास्क लावलेल्या युवकाला थांबवले. यानंतर, तो तरूण जिल्हाधिकाऱ्यांना एक कागद आणि मोबाईल फोनवर काही दाखविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, याच वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आरेरावी करत त्या तरुणाचा फोन घेतला आणि जमिनीवर फेकून फोडला.
पोलिसांनीही तरुणाला काठीने मारले -जिल्हाधिकारी साहेब एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पोलिसांना बोलावून त्या युवकाला मारण्याचेही आदेश दिले. पोलिसांनीही साहेबांच्या आदेशाचे पालन करत त्या तरुणाला काठीने मारले. विशेष म्हणजे, या व्हिडिओत जिल्हाधिकारी तरुणाला मारण्याचा आदेश देत असल्याचेही दिसून येत आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि लोकांना कोरोना नियमांचे पालन करायला सांगितले.
यासंदर्भात बोलताना, जिल्हाधिकारी रणबीर शर्मा म्हणाले, “आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात, मी एका तरुणाला थापड मारताना दिसत आहे. तो लॉकडाऊनदरम्यान बाहेर होता. आजच्या या कृत्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. संबंधित व्यक्तीचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता.”
लोकांनी नियमांचे पालन करावे आणि घरीच थांबावे -जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, “या महामारीच्या काळात सूरजपूर जिल्हासह संपूर्ण राज्यालाच मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. आम्ही राज्य सरकारचे सर्व सरकारी कर्मचारी सध्या या समस्येचा सामना करण्यासाठी प्रयत्नरत आहोत.” शर्मा म्हणाले, ते आणि त्यांच्या आईलाही कोरोची लागण झाली होते. ते बरे झाले आहेत. मात्र, आई अद्यापही संक्रमित आहे. त्यांच्या आईवर घरीच उपचार सुरू आहेत. तसेच आपण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो, की कोरोना नियमांचे पालन करा आणि घरीच थांबा, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, तरुण दुचाकीवरून वेगाने जात होता आणि त्याने गैरवर्तन केले होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले होते.