डेहरादून - येथील दून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. आर. राजेश कुमार यांनी चक्क बसमधून प्रवास केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बुधवारी सकाळी ते आयएसबीटी पोहचले अन् अचानकपणे थेट स्मार्ट सिटीच्या बसमध्ये चढले. या बसमधून तहसील चौकापर्यंत त्यांनी प्रवास केला. या प्रवासात स्वत:चं आणि सहकारी स्टाफचं तिकीटही त्यांनी स्वत:च्या पैशातून घेतलं.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या बसप्रवासात गाडीतील प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे त्यांनी आपले सीट सोडून उभे राहत प्रवास केला. स्मार्ट सिटी कंपनीची इलेक्ट्रीक स्मार्ट सेवेचे वाहतूक कशारितीने सुरू आहे. या प्रवासात प्रवाशांना कसे अनुभव येतात, हे माहिती करुन घेण्यासाठी त्यांनी स्वत: बसमधून प्रवास केला. या प्रवासात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवाशांसोबत चर्चाही केली. तसेच, प्रवाशांचे अनुभव ऐकून घेत सुधारणा करण्यासाठी सूचनाही घेतल्या.
बसमधील प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना देत ऑनलाईन पेमेंट सुविधेमुळे सुट्टे पैसे नसल्याची अडचणही दूर होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, बसमध्ये औषधोपचार पेटी आणि मास्क ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. या दौऱ्यात बस आणि आयएसबीटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचेही परीक्षण त्यांनी केले.