गुडगाव : गुडगाव येथील एका कॉलेजच्या बाहेरून एका विद्यार्थिनीचे सोमवारी दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले. अर्थात पोलिसांनी काही तासांतच या तरुणीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. याबाबत सविस्तर माहिती देण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला.येथील द्रोणाचार्य शासकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरून सदर तरुणीचे अपहरण करण्यात आले. सकाळी ९.३० वाजता झालेल्या या अपहरणाने एकच खळबळ उडाली. अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद झाला आणि त्यानंतर वृत्त वाहिन्यांवर झळकल्यामुळे राजधानी दिल्लीसह देशभरात खळबळ उडाली होती. अर्थात गुडगाव पोलिसांच्या विशेष तपास पथकाने काही तासांतच पीडित कॉलेज तरुणीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सहीसलामत सुटका केली. गुडगावचे पोलीस आयुक्त नवदीप सिंह विर्क यांनी सांगितले की, पीडित तरुणी आणि अपहरणकर्ते परस्परांना ओळखत होते. तीन अपहरणकर्त्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. (वृत्तसंस्था)असे झाले अपहरणसीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजनुसार, सकाळी ९.३० वाजता एक अपहरणकर्ता कॉलेजच्या एका भिंतीला पडलेल्या भगदाडातून आत आला. आरोपीने सदर तरुणीला आतून बाहेर बोलवले. तरुणीही आरोपीच्या मागे त्याच भगदाडातून बाहेर आली. बाहेर तिच्यासोबत काही मिनिटे बोलल्यानंतर आरोपीने बळजबरीने एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये कोंबले. या कारमध्ये त्याचे तीन सहकारी आधीच बसलेले होते. पीडित तरुणीने मदतीसाठी ओरडणे सुरू केले तोपर्यंत अपहरणकर्ते तिला कारमध्ये कोंबून पसार झाले. याचदरम्यान प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सूचना दिली. कारची नंबरप्लेट चिखलाने माखलेली असल्याने प्रत्यक्षदर्शी तिचा नंबर नोंदवू शकले नाहीत. एका प्रत्यक्षदर्शीने काही अंतरापर्यंत कारचा पाठलागही केला. मात्र यानंतर कार वेगाने पसार झाली.
कॉलेज तरुणीचे दिवसा अपहरण
By admin | Published: December 29, 2015 2:52 AM