मेरठ- उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांनी एक असं डिव्हाइस बनवलं आहे जे महिलांना जास्त सुरक्षित ठेवेल.या विद्यार्थ्यांनी 'वुमन सेफ्टी जॅकेट' बनवलं आहे. महिलांना चुकीच्या हेतुने स्पर्श करणाऱ्याला या जॅकेटमुळे 3000 वोल्टचा शॉक लागेल अशी सिस्टम या जॅकेटमध्ये आहे. इतकंच नाही, तर जॅकेटमध्ये फीड असणाऱ्या मोबाइल नंबरवर मदतीसाठी अलर्ट आणि लोकेशनही पाठवलं जाईल, अशी यंत्रणा या जॅकेटमध्ये आहे.
'वुमन सेफ्टी जॅकेट' मुरादाबाद इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. शिवम श्रीवास्तव, राजीव मौर्या, नितीन कुमार, निखिल कुमार आणि रिषभ भटनागर या पाच विद्यार्थ्यांनी जॅकेट तयार करण्यासाठी मेहनत घेतली आहे. 'देशामध्ये महिलांवर होणार अत्याचार वाढत आहेत. ही परिस्थिती पाहता महिला अधिक सुरक्षित रहाव्यात यासाठी असं जॅकेट तयार करण्याचा विचार केला, असं शिवम श्रीवास्तवने सांगितलं.
या जॅकेटमध्ये जीपीएस-जीएसएम बसविण्यात आलं आहे. जॅकेट दिसायला अगदी सामान्य आहे. कुणीही महिलेला चुकीचा स्पर्श केला तर त्या महिलेला जॅकेटच्या डाव्या बाजूला असलेलं बटण दाबायचं आहे. बटण दाबताच महिलेला स्पर्श करणाऱ्याला 3000 वोल्टचा शॉक लागेल. जॅकेटमध्ये फिड असलेल्या नंबरवर महिलेचं लोकेशन आणि अलर्ट पोहचेल. तसंच या जॅकेटमध्ये एक कॅमेरा लावण्यात आला आहे जो संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद करेल. इंजिनिअरिंगचे हे विद्यार्थी या प्रोजेक्टवर तीन वर्षापासून काम करत आहेत. जॅकेट तयार करण्यासाठी 15 हजार रूपये खर्च करण्यात आला.