- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) प्रमाणेच महाविद्यालयांमधील विद्यार्थीही आपल्या उत्तर पत्रिकांची फेरतपासणी करू शकणार आहेत. विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका तपासणीमध्ये होणाऱ्या चुका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गांभीर्याने घेतल्या आहेत.त्याचमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी तसेच विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी उत्तर पत्रिकांची फेरतपासणी करण्याची व्यवस्था लागू करावी, असे निर्देश दिले.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टीम (सीबीसीएस) लागू करण्याबरोबरच उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पद्धतीने परीक्षा होतात. अशा परीक्षांमधील तक्रारी दूर करण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे.यूजीसीचे सचिव प्रो. रजनीश जैन यांनी सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व रजिस्ट्रार यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास उत्तर पत्रिकांच्या फेरतपासणीचे दिशानिर्देश जारी केले आहेत. सध्या केवळ सीबीएसई बोर्डच विद्यार्थ्यांना रिचेकिंगनंतर उत्तरपत्रिका फेरतपासणीची सुविधा देते. यातील विद्यार्थ्यांचे वाढणारे गुण व बोर्डाच्या परीक्षेच्या प्रतिष्ठेवर उपस्थित केल्या जाणाºया प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने २०१७ मध्ये ही सुविधा बंद केली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात आली होती. यावर्षीही उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीत हजारो विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत.
कॉलेजांतही उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होणार शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:25 AM