नवी दिल्ली : ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाविषयी सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी या वास्तूचा रंग पिवळसर झाला होता. मात्र, आता त्यावर हिरव्या आणि करड्या रंगाच्या छटा उमटू लागल्या आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ताजमहालला त्याचे पूर्वस्वरूप प्राप्त करून द्या, अशी सूचनाही न्यायालयाने केंद्राला केली आहे.शहरातल्या वाढत्या प्रदूषणाचा ताजमहालालाही फटका बसत असून, त्याचा रंग दिवसेंदिवस बदलत आहे. त्यामुळे प्रदूषणापासून ताजमहालाचे संरक्षण व्हावे; आणि ताजमहालाच्या परिसरात वनक्षेत्राच्या मागणीसाठी पर्यावरणवादी एम.सी. मेहता यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. एम.बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. या वेळी त्यांनी वरील निरीक्षण नोंदवले.सुनावणीदरम्यान, याचिकाकर्ते मेहता यांनी ताजमहालाची पूर्वीची आणि आताची छायाचित्रे न्यायालयासमोर सादर केली व या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए.एन.एस. नाडकर्णी यांना केला.केंद्राने या प्रकाराची गंभीर दखल घेत, देशातील आणि परदेशातील तज्ज्ञांची मदत घेऊन ताजमहालाला त्याचे पूर्वस्वरूप प्राप्त करून द्यावे, अशी सूचना सर्वाेच्च न्यायालयाने केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे.
ताजमहालचा रंग बदलतोय; सर्वाेच्च न्यायालयाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 1:25 AM