नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता तिहारमध्ये फाशी देण्यात येणार आहे. मात्र त्याआधी रविवारी या तुरुंगात आरोपींची डमी तयार करून फाशीची शिक्षा देण्याची रंगीत तालीम घेण्यात आली.
मुकेश (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६), अक्षयकुमार सिंह (३१) या चार आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. फाशीच्या शिक्षेच्या रंगीत तालमीसाठी या आरोपींच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या. पोत्यांमध्ये दगड-माती भरून प्रत्येक आरोपीच्या वजनाइतक्या प्रतिकृती तयार आल्या. त्या पोत्यांना फासावर लटकावून या शिक्षेची रंगीत तालीम पार पडली. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना तिहार कारागृहातील कोठडी क्रमांक ३मध्ये मेरठ येथील पवन जल्लाद फाशी देणार आहे.
ही फाशी देण्याकरिता दोन जल्लाद पाठवावेत अशी विनंती तिहार कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश तुरुंगाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली होती. निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना एकाच वेळी फाशी दिले जाण्याची शक्यता आहे. या आरोपींशी तिहार कारागृहातील अधिकारी रोज संवाद साधत आहेत. आरोपींची मानसिक स्थिती नीट राखण्याकरिता असे करणे आवश्यक असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.अखेरची इच्छा जाणून घेणारनिर्भया प्रकरणातील चारही आरोपींची त्यांचे जवळचे नातेवाईक तिहार कारागृहात जाऊन २० जानेवारीला अखेरची भेट घेतील असे समजते. फाशीची शिक्षा द्यावयाच्या आरोपींसाठी असलेल्या नियमांनुसार त्यांची दिवसातून दोनदा वैद्यकीय तपासणी केली जाते.या चारही आरोपींवर सहा सीसीटीव्ही कॅमेºयांच्या मदतीने बारीक लक्ष ठेवण्यात येत असून त्यांची अखेरची इच्छा काय हेही तुरुंगाधिकारी जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.