शांतीलाल गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कनिजर/तापी : दक्षिण गुजरातमधील आदिवासी (एसटी) मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी काँग्रेस धडपडत असतांना महाराष्ट्र राज्य सरकारने गुजरातेत मतदानाला जाण्यास सीमावर्ती भागातील जिल्ह्यांना सुटी जाहीर केली आहे. त्याचा फायदा घेत या भागातील उमेदवारांनी महाराष्ट्रातील सग्यासोयऱ्यांना मदतीसाठी बोलावले आहे. ही कुमक उद्या व परवा दाखल होण्याची शक्यता आहे.
सुरत शहरात कामधंदा निमित्ताने जवळपास ४ ते ५ लाख मराठी भाषिक स्थायिक झाले आहेत. त्यांचा स्वतंत्र लिंबायत मतदार संघ तयार झाला असून तेथून भाजप, कांग्रेस व आप या प्रमुख पक्षांचे उमेदवार मराठी भाषिक आहेत. डांग मतदारसंघही नाशिकला लागूनच आहे. डांगमधून अनेक गुजराती नागरिक महाराष्ट्रात कामासाठी जातात. याशिवाय तापी जिल्ह्यातील निजर मतदार संघाला नंदुरबार, धुळे लागून आहे. हे दोन्ही जिल्हे आदिवासी बहुल असून त्यांचा तापी जिल्ह्याशी रोटी- बेटी व्यवहार आहे. विशेषतः या भागातील अनेक उमेदवार गावित (गुजराती भाषेत गामेत) जमातीचे आहेत. या उमेदवारांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे मंत्री विजयकुमार गावीत यांचा हातभार लागतो असे रामशरण गावित या कार्यकर्त्यांने सांगितले. निजरमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक मतदार व पाठीराखे येतात, असे स्थानिक रहिवासी संजयभाई विसावा यांनी सांगितले. निजरमध्ये सध्या १० टक्के मतदार मराठी भाषिक असल्याचे ते म्हणाले.