नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीन बागेत दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घातली आहे. शाहीन बागेत या आणि आमच्यासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करा, असं आवाहन आंदोलकांनी केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात १५ डिसेंबरपासून दिल्लीतल्या शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं पंतप्रधानांना शाहीन बागेत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. मोदींसाठी खास 'लव्ह साँग' आणि 'सरप्राईज गिफ्ट' तयार असल्याचंदेखील आंदोलकांनी सांगितलं आहे. 'पंतप्रधान मोदी, कृपया शाहीन बागेत या. तुमचं गिफ्ट घेऊन जा आणि आमच्याशी बोला,' असा मजकूर असलेले पोस्टर्स शाहीन बाग परिसरात पाहायला मिळत आहेत. 'पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा किंवा आणखी कोणीही इथे येऊन आमच्यासोबत संवाद साधू शकतात. सध्या जे काही घडतंय ते संविधानविरोधी नसल्याचं त्यांनी पटवून दिल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ,' असं शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्या सईद तासीर अहमद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. सीएएमुळे कोणाचंही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. उलट या कायद्याच्या माध्यमातून नागरिकत्व दिलं जाईल, असा सरकारचा दावा आहे. मात्र यामुळे देशाला नेमका काय फायदा होणार आहे, हे कोणीही सांगत नाही. सीएएमुळे बेरोजगारी, गरिबी, आर्थिक मंदी हटणार आहे का, याची उत्तरं कोणीच देत नाही, असंदेखील अहमद यांनी म्हटलं. सीएए, एनआरसीविरोधात शाहीन बाग, झाकीर नगर, जामिया नगर आणि दिल्लीतल्या इतर भागांत डिसेंबरपासून आंदोलनं सुरू आहेत. शाहीन बागेतल्या आंदोलकांनी नोयडा आणि आग्नेय दिल्लीला जोडणाऱ्या रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. या रस्त्यावरुन दररोज जवळपास पावणे दोन लाख वाहनांची ये-जा होते. या आंदोलनामुळे लाखो लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मोदीजी, तुमचं गिफ्ट घेऊन जा; व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं शाहीन बागेची पंतप्रधानांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 8:00 AM