काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ह्या यावेळी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, रायबरेली येथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोनिया गांधी ह्यांनी रायबरेलीतील जनतेला उद्देशून एक भावूक पत्र लिहिलं आहे.
मी माझी सासू आणि पती यांना गमावल्यानंतर रायबरेली येथे आले तेव्हा येथील जनतेनं मला आपलंस केलं, असे सोनिया गांधी या पत्रात म्हणाल्या. तसेच या पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी वाढतं वय आमि आरोग्याच्या समस्येमुळे येथून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.
सोनिया गांधी यांनी या पत्रात लिहिलं की, माझं कुटुंब दिल्लीमध्ये अपूर्ण आहे. ते रायबरेली येथे येऊन पूर्ण होतं. हा स्नेह आणि नातं खूप जुनं आहे. ते मला माझ्या सासरहून सौभाग्याप्रमाणे मिळालं आहे. रायबरेलीशी आमच्या आमच्या कुटुंबाच्या नात्याची असलेली पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत. पहिल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझे सासरे फिरोज गांधी यांना येथून निवडून दिल्लीला पाठवले. त्यानंतर माझी सासू इंदिरा गांधी यांना तुम्ही आपलंस करून स्वीकारलंत. तेव्हापासून हा क्रम जीवनातील चढ-उतार आणि कठीण मार्गावर प्रेम आणि उत्साहासह पुढे जात गेला. तसेच त्यावरील आमची आस्था अधिकाधिक भक्कम झाली.
या मार्गावर तुम्ही मलाही चालण्यासाठी जागा दिली. सासू आणि पतीला कायमचं गमावल्यानंतर मी तुमच्याकडे आले. तेव्हा तुम्ही मला आपलं म्हणून स्वीकारलंत. मागच्या दोन निवडणुकांमध्ये अगदी विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही एखाद्या पहाडासारखे माझ्यासोबत उभे राहिलात. मी हे कधीच विसरू शकणार नाही. आज मी जी काही आहे ती तुमच्यामुळे आहे, हे मी अभिमानाने सांगू शकते. मी हा विश्वास कायम ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.
आता आरोग्याची समस्या आणि वाढतं वय यामुळे मी पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. या निर्णयानंतर मला तुमची थेटपणे सेवा करण्याची संधी मिळणार नाही. मात्र माझं मन आणि प्राण तुमच्याजवळ असेल. प्रत्येक संकटात तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला जसं आतापर्यंत सांभाळलंत तसं यापुढेही सांभाळाल, याची मला जाणीव आहे, असेही सोनिया गांधी या पत्रात म्हणाल्या.